Ad will apear here
Next
आयुर्वेदाच्या साह्याने वाढवा करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती!


सद्यस्थितीत करोनाची भीती प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यासाठी अपुरी पडणारी वैद्यकीय यंत्रणा यामुळे स्वतः निरोगी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे, याव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या हातात काहीही नाही. या परिस्थितीत पथ्यपालन व स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविणे हे दोनच प्रकार शक्य आहेत. त्यासाठी नेमके काय करायचे, आयुर्वेदाच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय कोणते आहेत, आदींबद्दल साताऱ्यातील डॉ. चंद्रशेखर तांबे यांनी दिलेली ही माहिती... 
............
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ सर्वांसाठीच आरोग्यविषयक आव्हानांचा काळ आहे. विशेषत: २०१०पासून दर वर्षी एखादी परीक्षा घेणारी नवीन वैद्यकीय साथ विश्वासमोर येत आहे. चिकनगुनिया, डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू अशा अनेक साथींना आपण तोंड दिले. कित्येक रुग्ण दगावले, अनेक जण बरेही झाले; मात्र या साथी जागतिक पातळीवर महामारी स्वरूपात आल्या नाहीत. 

२०२० साल सुरू झाले आणि सर्व जग एका वैश्विक महामारीने वेढले गेले. करोना विषाणूच्या साथीने सध्या सर्व जगात कहर माजवला आहे. सध्या जगभरात बाधितांची संख्या कोटीच्या घरात, तर मृतांची संख्या लाखाच्या घरात आणि तरीही संसर्ग सुरूच अशी परिस्थिती आहे. याची भीती कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहे. या महामारीने प्रत्येक व्यवहारात, नात्यात खूप मोठी दरी निर्माण केली आहेच, त्याशिवाय आर्थिक परिस्थितीचे फार मोठे आव्हान प्रत्येकासमोरच उभे आहे. जोपर्यंत यावर अचूक औषध व लस मिळत नाही, तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात आणणे कठीण आहे. साथीचा प्रसार रोखण्यासाठी शासनातर्फे सर्व उपाययोजना सुरू आहेत. मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वैयक्तिक व घरांचे सॅनिटायझेशन करणे आणि लॉकडाउन या सर्व पातळ्यांवर सध्या काम सुरू आहे. मुळातच या आजाराची सविस्तर माहिती देणे व त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती कशी तयार करता येईल, याची सविस्तर माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. 

करोना व्हायरस
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या काळात प्रथम व्हायरस अर्थात विषाणूचा शोध लागला. शास्त्रज्ञांना असे दिसून आले, की सर्वसामान्य बॅक्टेरियापेक्षा (जिवाणू) अत्यंत लहान विविध प्रकारचे रोगजंतू, अत्यंत घातक आजार निर्माण करतात. झटपट प्रसार आणि संक्रमित रुग्णांचा मृत्युदर जास्त असल्यामुळे या रोगजंतूंना व्हायरस म्हणजे विषाणू असे नाव दिले गेले. (आरएनए मेसेंजर हे प्रोटीन स्वरूपात आहे.) 

व्हायरस हा सजीवही नाही, निर्जीवही नाही असा अतिसूक्ष्म रोगजंतू आहे. वरून प्रथिनांचे (प्रोटीनचे) आवरण व आतील बाजूस काही जीन्स (जनुके) अशी याची रचना असते. हा परोपजीवी प्रकारचा रोगजंतू आहे. जगातील सर्व सजीव प्रकारांसाठी हा घातक असतो. जोपर्यंत एखाद्या सजीव पेशीत प्रवेश करत नाही तोपर्यंत निष्क्रिय असतो. पेशीत प्रवेश केल्यावर मात्र त्यातील जीन्स सक्रिय होतात व प्रवेशित पेशीतील पोषक घटकांचा वापर करून आपली संख्यात्मक वाढ व प्रसार सुरू करतात. अर्थातच संक्रमित पेशी नष्ट होते. यातूनच निर्माण झालेले असंख्य विषाणू शरीरात पसरतात आणि असंख्य पेशी नष्ट करतात. यामुळे आजारी पडणे, आजार बळावणे आणि जीवितास धोका निर्माण होणे या अवस्था येतात. 

करोना व्हायरस याच जातकुळीतील विषाणू आहे. आतापर्यंतच्या संशोधनानुसार याच्या काही जमेच्या बाजू आहेत व काही धोकादायक बाजू आहेत. इतरांच्या तुलनेत हा थोडा जड असल्यामुळे त्याचा हवेमार्फत संक्रमण होण्याचा धोका कमी आहे. संक्रमित व्यक्तीच्या शिंकणे, खोकणे इत्यादी क्रियांतून जरी तो बाहेर पडला, तरी तो खाली बसतो. त्यामुळे अशा व्यक्तीची जवळीक टाळली तर दुसऱ्या व्यक्तीला संक्रमणाचा धोका नसतो. अजूनही संशोधन पूर्णावस्थेत नाही, तरीही प्राथमिक निष्कर्ष असे सांगतो, की निर्जीव वस्तूवर स्थिर झालेला हा व्हायरस सुमारे ७२ तासांनंतर नष्ट होतो. जोपर्यंत तो बाह्यत्वचेवर (कातडीवर) असतो तोपर्यंत तो सक्रिय होत नाही; मात्र अंत:त्वचेवर (म्युकस मेंब्रेनवर) पोहोचला, की तो सक्रिय होतो. नाकातून अगर घशातून संक्रमण झाल्यावर जर त्याचा प्रसार फुफ्फुसात झाला, तर तो जीवितास धोका निर्माण करतो. 

आपले नाक, तोंड, डोळे यातील अंतःत्वचा बाह्य वातावरणाशी सतत संपर्कात येते. त्यामुळे व्हायरसला या अवयवांत आपले संक्रमण करणे सहज शक्य होते. यातूनच त्याचा फुफ्फुसापर्यंतचा प्रवास अत्यंत थोड्या कालावधीत व जलद होऊ शकतो. याशिवाय शिंक, खोकला इत्यादी. बाह्य उत्सर्जन आजार पसरविण्यास मदत करते. म्हणूनच या अवयवांचे संरक्षण केल्यास करोनाचा धोका टाळण्यास मदत होते. याचसाठी मास्क, डिस्टन्सिंग, हात, पाय, चेहरा वरचेवर धुणे या गोष्टी आवर्जून करा. फक्त पोलीस वा शासकीय यंत्रणेसमोर दिखावा म्हणून या गोष्टी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे हे सर्वांसाठीच घातक आहे. ‘’जिओ और जिने दो’’ हेच आपले ध्येय आहे. यामुळे संक्रमण व बाधितांची संख्या आटोक्यात ठेवणे शक्य आहे. तसेच लस अथवा अचूक औषधे येत नाहीत, तोपर्यंत करोनाविरुद्धचे हेच खरे हत्यार आहे. 



आज तरी बाह्यत्वचेवरील (कातडीवर) संक्रमण आंघोळ, हात, पाय, चेहरा वरचेवर धुणे याचा वापर करून थांबवू शकतो. सॅनिटायझरमुळे करोना नष्ट होऊ शकतो. निर्जीव वस्तूवर ७२ तासांच्या वर तो टिकू शकत नाही इत्यादी बाबींचा विचार व अंगीकार केल्यास आपण करोनाची साखळी तोडू शकतो. याचा गंभीरपणे विचार करू या व करोनाला हरवू या. 

एखाद्या रोगजंतूचे शरीरात संक्रमण झाल्यापासून त्या आजाराची सुरुवात होण्यासाठी ठरविक काळ लागतो. त्याला संक्रमण काळ किंवा इन्क्युबेशन पीरियड असे म्हणतात. करोनाच्या बाबतीत हा काळ १४ दिवसांचा आहे. म्हणूनच संशयित व्यक्तीला १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाते. त्या व्यक्तीला बाधा झालीच नसेल अगर बाधा होऊनही त्याची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह येतात; अन्यथा पॉझिटिव्ह आल्यास त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवून उपचार केले जातात. दुर्दैवाने अशा व्यक्तीस करोना झालाच आहे, म्हणून वाळीत टाकण्याच्या घटना सध्या पुढे येत आहेत. कृपया या गोष्टी टाळा. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होते आणि करोना न होताही किंवा नसतानाही त्या व्यक्तीचे आपण मानसिक खच्चीकरण करतो. 

सद्यस्थितीत करोनाची भीती प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यासाठी अपुरी पडणारी वैद्यकीय यंत्रणा यामुळे करोनाची कोणतीही चाचणी सर्वसामान्य व्यक्ती करूच शकत नाही. अशा रामभरोसे अवस्थेत पथ्यपालन व स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविणे हे दोनच प्रकार शक्य आहेत. 

रोगप्रतिकारशक्ती
प्रत्येक सजीवाची जिवंत व निरोगी राहण्याची अहोरात्र धडपड सुरू असते. आपला देहही याला अपवाद नाही. जेव्हा एखादा रोगजंतू आपल्या शरीरात प्रवेश करतो, त्यावेळी त्याचा प्रतिकार करण्याची एक शक्ती आपल्या शरीरात असते. त्याला प्रतिकारशक्ती अगर रोगप्रतिकारशक्ती असे म्हणतात. यासाठी एक खास संस्था असते त्याला रोगप्रतिकारसंस्था असे म्हणतात. ही संस्था श्वेत पेशी, कॉम्प्लिमेंट सिस्टिम, लिम्फॅटिक सिस्टिम, प्लीहा, बोनमॅरो, थायमस इत्यादी घटकांनी बनते. 

रोगजंतू जेव्हा शरीरात प्रवेश करून आजार निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, त्या वेळी ही संस्था लगेचच काम सुरू करते. अगदी आपण जसे युद्ध लढतो तसेच काहीसे आपल्या शरीरात घडते. यात सदर जंतूंचा आकार, आंतररचना याचा अभ्यास केला जातो. पूर्वी कधी असा आजार झाला असेल तर त्या वेळी काय केले, कोणत्या अँटिबॉडीज तयार केल्या, कसा हल्ला केला व कशा नष्ट केल्या याची उजळणी केली जाते. यासाठी किती पांढऱ्या पेशींची गरज लागली, त्या पद्धतीत पेशींची कुमक वाढविली जाते आणि जंतू नष्ट करून शरीर निरोगी बनविले जाते; मात्र रोगजंतू नवीन असल्यास, जुन्याच्या रचनेत बदल असल्यास किंवा जंतूंचा तीव्र प्रादुर्भाव असल्यास हे युद्ध लढणे, जिंकणे याचा कालावधी वाढू शकतो अगर हे हरूही शकतो. आपण सर्व आज हे चित्र अनुभवत आहोत. 

या सर्व घडामोडीत रोगप्रतिकार संस्थेला मदत करणे व पूरक उपचार करणे हे वैद्यकीय विश्वाचे ध्येय असते व त्याला अनुसरून उपचार केले जातात. 

उपचार पद्धती
ही दोन प्रकारची असते. प्रथम ज्याला आजार झाला आहे त्याचा आजार बरा करणे. त्याशिवाय निरोगी व्यक्तीला आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे. करोनाच्या लढ्याची आगेकूच या दोन्ही स्तरावर आपण अनुभवत आहेात. एकाच वेळेला करोनावर औषध शोधणे सुरू आहे व लस तयार करणेही सुरू आहे. 
आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे आजाराच्या पथ्याबरोबरच त्याची लस देणे हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे एकमेव व प्रभावी साधन आहे. लसीमार्फत शरीराला या रोगजंतूंचा आकार, संरचना इत्यादी संपूर्ण माहिती पुरविली जाते व याचा वापर करून रोगप्रतिकारसंस्था त्या आजाराविरुद्ध योग्य युद्धाभ्यास करून प्रतिकारशक्ती वाढवू शकते. 



कमकुवत रोगप्रतिकारशक्ती
कित्येक व्यक्ती अशा असतात, ज्या वारंवार आजारी असतात. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी अगर कमकुवत असते. वारंवार आजारांमुळेच रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे नाही, तर अकारण, अतिप्रमाणात व वारंवार औषधे विशेषत: प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) सेवन करणे हेपण महत्त्वाचे कारण आहे. या लेखाच्या माध्यमातून मी सर्व लोकांना आवर्जून आवाहन करू इच्छितो, की स्वत:ची स्वत: किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कृपया औषधे घेऊ नका. गरज असेल तरच औषधे घ्या. अतिरेकी औषधांचा वापर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत करतो हे लक्षात ठेवा. 

याशिवाय डायबेटिस, ब्लडप्रेशर, हृदयविकार व कॅन्सर असणाऱ्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. क जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व, झिंकसारखी खनिजे यांच्या सेवनाने यात थोडी फार सुधारणा करता येते. 

प्रतिकारशक्ती व आयुर्वेद
प्रत्येक आजाराची उपलब्ध लस घेऊन प्रतिकारशक्ती निर्माण करणे हा जवळचा व सोपा उपाय आहे; मात्र त्यालाही मर्यादा आहेत. अशा उपचारांनी आपण फक्त त्या आजाराची खात्री देऊ शकतो; पण नवीन येणाऱ्या रोगसंक्रमणाचे काय हा प्रश्न शिल्लक राहतो. मग सर्वसमावेशक सर्वांगीण प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घेतली तर! याचे उत्तर आयुर्वेदात मिळते. 



आयुर्वेदीय विचार
आयुर्वेद शास्त्राचा मूळ उद्देश आहे ‘स्वस्थ्यस्य स्वास्थ्यम् रक्षणं’ अर्थात निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकविणे. इ. स. पू. ५००० वर्षे या काळात मानव शेतीच्या निमित्ताने, विविध गरजांच्या निमित्ताने एकत्र वस्ती करून राहू लागला. यातूनच साथीच्या आजारांचा उगम झाला. याला जनपदोध्वंस व्याधी म्हणजे समाज उद्ध्वस्त करणारी व्याधी असे संबोधले गेले. 

याच्या विरुद्ध कोणते उपचार करावेत, यावर त्या काळातील ऋषीमुनींनी भरपूर विचारमंथन केले. एक निष्कर्ष असा निघाला, की साथीच्या काळात ज्यांचे आरोग्य उत्तम होते, त्यांना साथीचे आजार झाले नाहीत किंवा ते लवकर बरे झाले. यातूनच सर्व वयात आरोग्य टिकविण्यासाठी व जरा म्हणजे म्हातारपण उशिरा येण्यासाठी रसायन व वाजीकरण उपचारांचा जन्म झाला. एकविसाव्या शतकात आजही आपण याच परिस्थितीला सामोरे जात आहोत व हीच उपचारपद्धती फलदायी ठरू शकते. 

रसायन उपचार पद्धतीत, एक वर्ष रोज ठराविक प्रमाणात आवळे खावेत असे न्युट्रिशनल सप्लिमेंटसारखे साधे उपचार आहेत. तसेच आमलकी रसायन, ब्राह्मरसायन च्यवनप्राशसारख्या औषधीपण आहेत. यातून (व्हिटॅमिन सी) क जीवनसत्त्व, प्रोटिन्स, फॅट, कार्बोहायड्रेट अशा पूरक आहारांबरोबरच विविध आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करणारे घटकही मिळतात. प्राथमिक संशोधनाच्या निष्कर्षानुसार एखाद्या आजाराविरुद्ध आपल्या शरीरात निसर्गत: प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास २४ ते २६ दिवसांचा कालावधी लागतो. याचाच अर्थ करोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती निर्मिती सुरू झाली आहे; मात्र त्या तुलनेत उद्रेक वाढत आहे. परिणामत: प्रतिकारशक्ती अपुरी पडताना दिसते. अशा अवस्थेत आयुर्वेदिक उपचार नक्कीच उपयुक्त ठरतील. 

अश्वगंधा

आयुर्वेदिक उपचार दीर्घ काळाने काम करणारे, पण शाश्वत उपचार असतात. यावर अत्यल्प काळात घाईगडबडीने निष्कर्ष काढणे अयोग्य आहे; मात्र तरीही प्रश्नअचिन्हे उपस्थित केली जातात; मात्र हे अयोग्य कसे आहे याचे दाखले मी तुम्हास देत आहे. आपण येथे रोगप्रतिकारशक्तीचाच विचार करू. यासंबंधी जागतिक पातळीवर झालेल्या प्राथमिक संशोधनाचे निष्कर्ष असे आहेत. आपल्या शरीरात अँटिबॉडीज किंवा इम्युनोग्लोबिलिन्सचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी काही घटक वाढविणाऱ्या गुळवेल, भुईआवळी, पिंपळी, तुलसी अशा अनेक वनस्पती आहेत. याच संस्थेत कार्यरत अवयव, जसे यकृत, प्लीहा, बोनमॅरो यांसारख्या अवयवांना बळ देणाऱ्या गुळवेल, मिरी, पिंपळी यांसारख्या वनस्पती आहेत. अश्वगंधासारखी वनस्पती थायमसवर कार्य करते. अशा प्रकारे रोगप्रतिकार संस्थेतील बहुतांश घटकांवर काम करून त्यांना बळ देणाऱ्या वनस्पती आज उपलब्ध आहेत. 

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आयुष मंत्रालयाने काही घरगुती काढ्यांचा पाठ दिला आहे. त्याचा वापर करून आपण नक्कीच फायदा करू शकतो. याशिवाय स्थानिक पातळीवर विविध वैद्यांकडे जाऊन आपल्या प्रकृतीला उपयुक्त काढे अगर औषधे घेऊ शकता. लहान मुलांसाठी सुवर्णप्राश रोजच व आवर्जून द्या. यातही मुलांच्या वयानुसार वेगवेगळे सुवर्णप्राशही आम्ही आमच्या दवाखान्यात बनवले आहेत. 

या संपूर्ण लेखात अत्यंत सोप्या शब्दात करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती याचे विवेचन केले आहे. करोनाची भीती सोडा, प्रतिकारशक्ती वाढवा व सुखी व्हा, हीच सदिच्छा!

- डॉ. चंद्रशेखर तांबे, सातारा. 
संपर्क : ९८२२४ २४८६५
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IXEACQ
Similar Posts
करोनानंतर संभाव्य महामारींच्या प्रतिकारासाठी आपण ‘या’ जबाबदाऱ्या घेणार का? गेले सुमारे आठ-नऊ महिने आपण सतत ‘करोना’ महामारीच्या दडपणाखाली वावरत आहोत. या महामारीची तीव्रता आता कमी होत असली, तरी अद्याप तिचा पूर्ण बीमोड झालेला नाही. ‘आयुर्वेद’ आणि ‘योग’ या आपल्या अस्सल भारतीय चिकित्सा पद्धती सोडल्या, तर अन्य सर्व चिकित्सा पद्धतींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दृष्टीने यापुढील
पी हळद (दूध), वाढव प्रतिकारशक्ती ‘पी हळद हो गोरी’ ही म्हण मागे पडून ‘पी हळद (दूध), वाढव प्रतिकारशक्ती’ अशी नवी म्हण करोनाच्या काळात व करोना-उत्तरकाळात रूढ करावी लागेल अशी लक्षणं आता दिसू लागली आहेत. आयुर्वेदात सर्व रोगांसाठी सर्वांना खात्रीशीर लागू पडणारा व प्रतिकारशक्ती वाढवणारा एकच रामबाण उपाय नसतो. रुग्णाच्या वयापासून अनेक घटक लक्षात घेऊन औषधयोजना केली जाते
करोना काळातही निर्भयपणे काम करणारे पुण्यातील ज्येष्ठ डॉक्टर दिलीप देवधर यांचे अनुभव माझ्यासारखा एक सामान्य फॅमिली डॉक्टर गेल्या चार महिन्यांपासून जे काही चालले आहे हे चुकीचे चालले आहे, हे सातत्याने सांगत आहे; पण इपिडेमिक अॅक्टप्रमाणे आम्ही डॉक्टर सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलू शकत नाही. म्हणून आपण आपल्या अनुभवाप्रमाणे व ‘प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन’च्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आचरणात आणायचे ठरविले
करोना विषाणू : ‘हे’ शास्त्रीय मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का? करोना विषाणूमुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या आजारामुळे भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ (COVID-19) असे त्याचे नामकरण केले असून, जगभर त्याची साथ असल्याचे (पँडेमिक) जाहीर केले आहे. ही परिस्थिती काळजी वाटण्यासारखी आहे; मात्र सोशल मीडियासह अनेक माध्यमांतून ऐकीव किंवा अशास्त्रीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language